छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) :वाळूज एमआयडीसी परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला प्रेग्नंट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ १६ वर्षांच्या मुलीला एका मुलाला जन्म द्यावा लागला असून, या प्रकरणी अद्याप संशयिताचे नाव समोर आलेले नाही. मुलगी व तिचे नातेवाईक काहीही बोलण्यास तयार नसल्याने पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
घनसावंगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक खरात यांनी हा गुन्हा नोंदवला असून, घटना वाळूज एमआयडीसी हद्दीत झाल्याने तपास तिकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे या तपास करत आहेत.
पोलिसांना ही माहिती घनसावंगी ग्रामीण रुग्णालयातून मिळाली. तिथे अल्पवयीन मुलगी उपचारासाठी दाखल झाली होती. पोलिसांनी तिचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला; मात्र मुलीने काहीही सांगण्यास नकार दिला.
मुलगी पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावातील रहिवासी आहे. संशयित हा वाळूज एमआयडीसीत राहत असल्याचे आणि तिथेच त्याने अत्याचार केल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले आहे.
प्रसूतीसाठी मुलीला अंबड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे तिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर कुणालाही न सांगता घरी जाण्याचा प्रयत्न झाला; पण पोलिसांना ही बाब समजताच त्यांनी कुटुंबाला थांबवून चौकशी केली. सध्या मुलगी आणि तिचे बाळ उपचारासाठी जालना येथील स्त्री रुग्णालयात दाखल आहेत.दरम्यान, या प्रकरणातील संशयिताचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.