बुलडाणा / छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) –आईच्या मायेच्या ओलाव्याऐवजी फक्त छळ, सावत्र बापाच्या विकृतीचा बळी आणि या सगळ्याला कंटाळून १० वर्षीय बालिकेने थेट बुलडाण्याहून संभाजीनगर गाठल्याची मन हेलावणारी घटना शुक्रवारी (१८ जुलै) उघडकीस आली. या प्रकरणी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तातडीने लक्ष घालून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
आईचा खऱ्या अर्थाने साथ न मिळाल्याने तुटलं बालविश्व
आराध्या (नाव बदलले) ही मुलगी काही वर्षांपूर्वी आईसोबत संभाजीनगरमधील विजयनगर परिसरात राहत होती. तिचे वडील वेगळे राहत असल्याने तिचा त्यांच्याशी संपर्क नव्हता. काही काळानंतर तिच्या आईने बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीजवळील एका शेतकऱ्याशी दुसरे लग्न केले आणि आराध्या सावत्र वडिलांसोबत राहू लागली. मात्र, हा नवा ‘घरकुल’ आराध्यासाठी नरकसमान ठरला.दारूच्या नशेत सावत्र बापाने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. एकदा ती आरडाओरड केल्याने वाचली.
तिने हा प्रकार काकूला सांगितला आणि काही काळ ती तिच्याकडे राहिली. मात्र पुन्हा आईकडे आल्यानंतर सावत्र बापाचे विकृत वागणे अधिकच विक्राळ झाले. दोन-तीन वेळा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेने हे सगळं आईला सांगितले, पण आईने उलट तिच्यावरच राग काढत तिला चटके दिले, मारहाण केली आणि तोंड बंद ठेवण्यास सांगितले. एका वेळी तर तिच्या गळ्याला चटका दिल्याचेही तिने सांगितले.
थेट संभाजीनगरचा रस्ता धरला,
मावशीकडे मिळाली थोडीशी मायाया छळाला कंटाळून आराध्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला. मे महिन्यात झालेल्या अत्याचारानंतर तिने पैसे जमवायला सुरुवात केली. पुरेसे पैसे जमवून तिने गुरुवारी (१७ जुलै) बुलडाणा सोडले आणि थेट संभाजीनगर गाठले. सिडको बसस्थानकावर पोहचल्यावर ती रडू लागली. रिक्षाचालकांनी दुर्लक्ष केले, पण एका संवेदनशील प्रवाशाने तिची चौकशी केली. त्यावेळी आराध्याने तीन वर्षांपूर्वी राहत असलेल्या चव्हाण मावशीचा मोबाईल नंबर दिला. त्या प्रवाशाने चव्हाण यांच्याशी संपर्क साधून आराध्याला त्यांच्या घरी पोहोचवले.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांपर्यंत नेला
प्रकारही बाब कळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ व उपशहरप्रमुख राजेश जंगले पाटील यांनी त्वरित लक्ष घालून पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली. आयुक्तांनी गंभीरतेने दखल घेतली आणि पीडितेचा जबाब घेण्याचे आदेश दिले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक ज्योती गात यांच्या मार्गदर्शनाखाली उशिरापर्यंत तिचा जबाब नोंदवला जात होता.
पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्नांची अपेक्षाही घटना समाजाला हादरवून टाकणारी असून, अशा विकृत प्रवृत्तींच्या विरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. आईचा साथ देण्याऐवजी झालेला छळ, बापाच्या नावाखाली पाशवी वागणूक आणि अखेरीस एका १० वर्षांच्या मुलीची शहरांतराची धडपड — या साऱ्याचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.—(टीप : पीडित मुलीची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी नाव बदलण्यात आले आहे.)