Advertisement Advertisement

समृद्धीवर धावता धावता गाडीचा एक्सेल तुटला; बॅरिकेडला धडकली अन् काही तासांनी गाडीने घेतला पेट!

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज): नागपूरहून जालन्याकडे जाणाऱ्या वाहनाचा अचानक एक्सेल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बॅरिकेडला धडकले. या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, अपघातग्रस्त वाहनाला काही तासांनंतर अचानक आग लागल्याने वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. ही घटना मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १ वाजता वाहन क्रमांक एमएच २० ईके ६००८ नागपूरहून जालन्याकडे जात होते. मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३००.२ जवळ अचानक वाहनाचा एक्सेल तुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी बॅरिकेडला जाऊन धडकले.

या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र, चालक परमेश्वर उद्धवराव चव्हाण (वय ४२, रा. खुरामपूर, ता. लोणार) हे सुदैवाने बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सुमारे ६.१० वाजता अपघातग्रस्त वाहनाला अचानक आग लागली. वाहनाला आग लागल्याची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षाने सकाळी ६.१५ वाजता मेहकर पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.

माहिती मिळताच मलकापूर येथील महामार्ग पोलीस केंद्रांतर्गत वाकी समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने वाहनाला लागलेली आग विझवली. मात्र, तोपर्यंत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

घटनास्थळी डब्ल्यूपीएसआय अनिता इर्शिद, हेकाँ. देवेंद्र पायघन, पोकाँ. इरफान शेख, आकाश यादव, प्रशांत इंगळे आदींनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद मेहकर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास व कार्यवाही मेहकर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!