बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव तथा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा वाढदिवस आज बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील चार-पाच दिवसांपासून विविध सामाजिक आणि शुभेच्छा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने त्यांच्या वाढदिवसाला अक्षरशः ‘वाढदिवस सप्ताहा’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, आज बुलढाणा शहरातून काढण्यात आलेली भव्य स्वागत मिरवणूक विशेष चर्चेचा विषय ठरली.
‘हवा म्हणतात ती याला!’ अशी चर्चा आज बुलढाण्याच्या रस्त्यांवर रंगली होती. विद्याधर महाले यांच्या स्वागतासाठी मित्रपरिवाराच्या वतीने धाड नाक्यापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक मार्गक्रमण करत असताना रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते शेकडो JCBच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पुष्पवृष्टीने. JCBच्या बकेटमधून महाले यांच्यावर फुलांची उधळण करण्यात येत असल्याचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. फुलांनी न्हाऊन निघालेले विद्याधर महाले आणि त्यांच्या स्वागतासाठी जमलेला जनसमुदाय यामुळे शहरातील वातावरणात चांगलाच उत्साह निर्माण झाला होता.
कार्यतत्परतेची पावती; सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त सहभाग
उच्चपदावर कार्यरत असतानाही सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणि प्रश्नांची जाण ठेवणारे अधिकारी म्हणून विद्याधर महाले यांच्याकडे पाहिले जाते. कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता आणि संवेदनशीलतेमुळे अनेकांच्या कामांना गती मिळाल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना मिळणारा सर्वसामान्यांचा प्रतिसाद हा त्यांच्या कार्याची पावती असल्याचेही बोलले जात आहे.
आज बुलढाणा शहरातील सहकार विद्या मंदिर येथे मित्रपरिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यापूर्वी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने मात्र संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
रस्त्यांवर झालेली गर्दी, फटाक्यांचा कडकडाट, ढोल-ताशांचा गजर, JCBमधून होणारी फुलांची उधळण आणि शुभेच्छांचा वर्षाव अशा उत्साहपूर्ण वातावरणात विद्याधर महाले यांचा वाढदिवस बुलढाण्यात साजरा झाला. स्वागत सोहळ्याची भव्यता पाहता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरात अक्षरशः उत्साहाचा महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.













