Advertisement Advertisement

वर्गणीची पावती फाडायच्या आधी परवानगी घ्या! गणपती बसवायचा तर आधी कागदपत्रं जमवा! परवानगी न घेता पैसे गोळा केले तर मंडळावर थेट गुन्हा!

वर्गणीची पावती फाडायच्या आधी परवानगी घ्या! गणपती बसवायचा तर आधी कागदपत्रं जमवा! परवानगी न घेता पैसे गोळा केले तर मंडळावर थेट गुन्हा!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवाची तयारी सुरू होत असतानाच सार्वजनिक मंडळांसाठी धर्मादाय विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. सार्वजनिक वर्गणी किंवा देणगी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय उपायुक्त अथवा सहायक धर्मादाय आयुक्तांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी न घेता वर्गणी संकलन केल्याचे आढळल्यास संबंधित मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे धर्मादाय विभागाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील कलम ४१-क नुसार सार्वजनिक वर्गणी अथवा देणगी गोळा करण्यासाठी ऑनलाइन परवानगी घेण्याची तरतूद आहे. नोंदणीकृत संस्था किंवा न्यास वगळता सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गोत्सव आदींसाठी वर्गणी जमा करणाऱ्या इतर मंडळांना ही परवानगी घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे उत्सवाच्या तयारीसोबतच मंडळांनी वर्गणी संकलनासाठी आवश्यक परवानगीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन धर्मादाय विभागाकडून करण्यात आले आहे.

परवानगीसाठी कोणती कागदपत्रे लागणार?

ऑनलाइन अर्ज करताना मंडळातील सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र, उत्सवाच्या जागेचे संमतीपत्र किंवा ग्रामपंचायत, नगरपंचायत अथवा नगरपालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र, मंडळ स्थापनेचा ठराव, उत्सव समितीचा ठराव तसेच कार्यकारी मंडळाच्या प्रतिनिधींची नावे, पत्ते व संपर्क क्रमांक आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

जुन्या मंडळांना हिशोबही द्यावा लागणार

मागील वर्षी कार्यरत असलेल्या मंडळांनी मागील वर्षातील जमा-खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे. जमा-खर्चाची रक्कम ५ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास लेखापरीक्षकाचा (सीए) अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यासोबत मागील वर्षीच्या पावती पुस्तकांची माहितीही अर्जासोबत देणे आवश्यक आहे.

ऑनलाइन परवानगी कशी घ्यायची?

मंडळांनी धर्मादाय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘४१-क’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर अर्जातील आवश्यक माहिती भरून संबंधित कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावीत. अर्जाची छाननी झाल्यानंतर नियमानुसार ऑनलाइन परवानगी देण्यात येईल.

परवानगी मिळाल्याशिवाय वर्गणी सुरू करू नका!

मंडळाला परवानगी मिळाल्यानंतर मंजूर परवानगीतील अटी आणि कालावधीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. परवानगी मिळण्यापूर्वी वर्गणी अथवा देणगी संकलन सुरू करू नये, असे धर्मादाय विभागाने स्पष्ट केले आहे.

अर्ज करताना उत्सवाचा कालावधी, वर्गणी संकलनाचा उद्देश तसेच मंडळाची आवश्यक माहिती अचूकपणे नमूद करावी. विनापरवानगी किंवा बेकायदेशीर पद्धतीने वर्गणी गोळा करून तिचा गैरवापर केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा धर्मादाय विभागाने दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!