देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील संजय नगर परिसरातील एका पडक्या वाड्यात अंदाजे दोन दिवसांच्या अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी परतणाऱ्या काही लहान मुलांच्या हा प्रकार निदर्शनास आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय नगर परिसरातील या पडक्या वाड्यात काही दिवसांपासून एक कुत्री व तिची चार-पाच पिल्ले राहत होती. मंगळवारी काही मुलांना वाड्यात अर्धवट कुरतडलेल्या अवस्थेत काहीतरी आढळून आले. सुरुवातीला नेमके काय आहे, याबाबत मुलांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, ते अर्भकाच्या शरीराचा भाग असल्याचे लक्षात आल्यानंतर ही माहिती परिसरात पसरली.
घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळावरून आवश्यक नमुने व पुरावे संकलित केले.
अर्भकाचा मृत्यू कशामुळे? पोलिसांकडून तपास…
हे अर्भक नेमके किती दिवसांपासून त्या ठिकाणी होते, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, अर्भकाला तेथे कोणी आणून सोडले तसेच ते स्त्री जातीचे की पुरुष जातीचे होते, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. शवविच्छेदन व फॉरेन्सिक तपासणीनंतर या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल….
या प्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी दावल शेख फरीद यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ९४ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणात कोणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते. पोलिसांकडून परिसरातील माहिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.













