चांडोळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील धाड पोलीस मोहल्ल्यात अश्लील फोटो पाठविल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन जणांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी धाड पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (२४ ऑगस्ट) रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता फिर्यादी शेख जुमान शेख जकाउल्ला (वय ३०, रा. खोजी मोहल्ला, चांडोळ) हे आपल्या भाच्यासह घरासमोर बसले होते. त्यावेळी त्याच मोहल्ल्यातील शेख रईस शेख युनूस तेथे आला. अश्लील फोटो पाठविल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत होताच आरोपी शेख रईस याने चाकू काढून शेख जुमान यांच्या पोटावर वार केला. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सोहिल खान शफिक खान याच्यावरही आरोपीने चाकूने हल्ला करत त्याच्या पोटावर वार केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून धाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९(१), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीनसिंह चौहान करीत आहेत.













