बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव शिवारात पुलाजवळ रस्त्यातून लोखंडी अँगल तब्बल एक ते दीड फूट वर आल्याने धावत्या कारचे मोठे नुकसान झाले. या अँगलला धडकून कारची डिझेल टाकी फुटली, तसेच चेन व अंतर्गत पार्टचेही नुकसान झाले. ही घटना २३ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठ वाजता घडली.
समृद्धी महामार्गावरून चोवीस तास शेकडो वाहने धावत असतात. पुलांच्या ठिकाणी वापरण्यात आलेले काही लोखंडी अँगल उघडे पडल्याचे दिसून येत आहे. तढेगाव शिवारातील पुलाजवळही असाच अँगल रस्त्याच्या मधोमध वर आला होता. एमएच २८ डब्ल्यू ०५२८ क्रमांकाचे वाहन त्यावर आदळल्याने मागील चाकांच्या मधोमध असलेली डिझेल टाकी फुटली.
वाहनात तीन जण प्रवास करीत होते. अँगलला धडक बसताच चालकाने प्रसंगावधान राखून वाहनावरील नियंत्रण मिळवले आणि वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे उभे केले. त्यानंतर अपघाताची शक्यता लक्षात घेऊन चालकाने स्वतःचा जीव धोक्यात घालत रस्त्याच्या मधोमध उभे राहून येणाऱ्या वाहनचालकांना इशारा केला आणि वाहने बाजूने नेण्यास सांगितले. त्यामुळे पुढील वाहनांचे नुकसान तसेच संभाव्य जीवितहानी टळली.
समृद्धी महामार्गावर अशा प्रकारे लोखंडी अँगल उघडे पडणे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे तढेगावसह महामार्गावरील पुलांजवळील सर्व लोखंडी अँगलची तातडीने पाहणी करून धोकादायक भाग दुरुस्त करावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. दरम्यान, या घटनेतील वाहनधारकाचे नाव समजू शकलेले नाही.













