Advertisement Advertisement

गुप्त खबर आली अन् पोलिसांनी कट्टा घेऊन फिरणाऱ्याला धरलं! चिखली शहरातील संभाजीनगरात सराईत गुन्हेगार पिस्तुलासह जेरबंद….

गुप्त खबर आली अन् पोलिसांनी कट्टा घेऊन फिरणाऱ्याला धरलं! चिखली शहरातील संभाजीनगरात सराईत गुन्हेगार पिस्तुलासह जेरबंद….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहर व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चिखली पोलिसांकडून रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात आली आहे. याच रात्रपाळी गस्तीदरम्यान चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तुलासह रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संभाजीनगर परिसरात करण्यात आली.

पोलिस कर्मचारी रात्रकालीन पेट्रोलिंग करीत असताना, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ईश्वर धनवटे हा घातक आग्नेयास्त्र बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून डी.बी. पथकाने संभाजीनगर येथील गोपाळ किराणा दुकानासमोर सापळा रचला.

रात्री सुमारे १२ वाजून ५० मिनिटांनी पायी जात असलेल्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव ईश्वर प्रकाश धनवटे (वय २५, रा. गोरक्षणवाडी, चिखली) असे सांगितले.

पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूला एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. काळ्या रंगाची प्लास्टिक ग्रीप असलेल्या या पिस्तुलाच्या दोन्ही बाजूंना स्टारचे चिन्ह असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलिसांनी मॅगझिनसह अंदाजे ४५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शामराव शिंदे यांच्या लेखी रिपोर्टवरून चिखली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल गवई करीत आहेत.

रात्रीच्या गस्तीमध्ये मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!