जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील दुर्गामाता मंदिरातील देवीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. सुमारे ९०० ग्रॅम वजनाचा आणि अनेक वर्षे जुना असलेला हा मुकुट चोरीला गेल्याने मंदिर परिसरात खळबळ उडाली आहे.
अंबादास भाकरे हे नियमितपणे दुर्गामाता मंदिरात पूजा-अर्चना व देवीची आरती करण्यासाठी जातात. तसेच प्रकाश देशपांडे महाराज हे मंदिरातील पूजा-अर्चनेसह देखभालीचे काम पाहतात. १४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता भाकरे मंदिरात गेले असता देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, सायंकाळी सुमारे ५ वाजता रोहित गजानन कल्याणकर यांनी भाकरे यांना फोन करून मंदिरातील देवीच्या अंगावरील फुलांचे हार उचकटलेले असून, देवीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर भाकरे यांनी कल्याणकर व अजय गजानन गवडे यांच्यासोबत मंदिर परिसर तसेच आजूबाजूच्या भागात मुकुटाचा शोध घेतला. मात्र, मुकुट कुठेही आढळून आला नाही.
९०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट….
चोरीस गेलेला चांदीचा मुकुट सुमारे १५ ते २० वर्षे जुना असून त्याचे वजन अंदाजे ९०० ग्रॅम असल्याचे सांगण्यात आले. त्याची अंदाजे किंमत ४ हजार ८०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने मंदिरातून मुकुट लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धार्मिक स्थळांवर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने भाविकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच….
दरम्यान, जळगाव जामोद तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे. विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचे मनोबल वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, पोलिसांनी चोरीच्या घटनांचा तपास करून चोरट्यांवर आळा घालावा आणि शहरासह ग्रामीण भागात पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.













