Advertisement Advertisement

सुलतानपूरकडे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या ऑटोला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू….

सुलतानपूर(बुलडाणा कव्हरेज न्युज): श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त सुलतानपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या ऑटो रिक्षाला शुक्रवारी सुलतानपूर-भानापूर मार्गावर भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो रस्त्यालगतच्या विद्युत खांबावर जाऊन आदळली. या अपघातात भगवान शामराव मुळे (वय ७०, रा. उदनापूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर ऑटोमधील अन्य काही प्रवासी गंभीर जखमी झाले.

श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सुलतानपूर येथे आगमन झाल्याने पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी सुलतानपूरकडे येत होते. शुक्रवारी उदनापूर येथून भाविकांना घेऊन ऑटो रिक्षा सुलतानपूरच्या दिशेने येत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव ऑटो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर जाऊन आदळली.

अपघाताची तीव्रता एवढी होती की, भगवान मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. ऑटोमधील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींची नावे वृत्त लिहेपर्यंत समजू शकली नव्हती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना ऑटोतून बाहेर काढून तातडीने मेहकर येथे उपचारासाठी हलविले.

गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!