Advertisement Advertisement

बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील?आ. श्वेता महाले यांच्या मागणीची मुख्यमंत्री फडणवीसांकडून तात्काळ दखल; प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीचा ऐतिहासिक सन्मान वाढविण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या नामकरणाचा विषय आता प्रशासकीय पातळीवर पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. विशेषतः सिंदखेडराजा ही राजमाता जिजाऊंची जन्मभूमी असल्याने या जिल्ह्याला महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत त्यांच्यात स्वराज्याची प्रेरणा रुजवली. त्यांच्या या अतुलनीय योगदानाला कायमस्वरूपी अभिवादन म्हणून जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी मागणी आ. श्वेता महाले यांनी केली आहे.

ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांचा मुद्दाही मांडला…

मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना आ. महाले यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनविषयक वैशिष्ट्यांकडेही लक्ष वेधले. सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, लोणार सरोवर, शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर, मेहकरचे शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य यांसह जिल्ह्यातील विविध धार्मिक व पर्यटनस्थळांमुळे बुलढाणा जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

राजमाता जिजाऊंच्या नावाने जिल्ह्याला नवी ओळख मिळाल्यास त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा सन्मान होण्यासोबतच जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाला अधिक व्यापक ओळख मिळू शकते, असा मुद्दा या मागणीमागे आहे.

आता प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लक्ष….

आ. श्वेता महाले यांच्या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने नामकरणाचा विषय चर्चेत आला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे ‘राजमाता जिजाऊनगर’ असे नामकरण होणार का? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीला त्यांच्या नावाने नवी ओळख मिळावी, या मागणीच्या पुढील प्रशासकीय प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!