मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील जिजाऊ चौक परिसरातील गणराज भोजनालयात काम करणाऱ्या एका ३२ वर्षीय युवकाने दारूच्या नशेत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत युवकाचा जीव वाचला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल रमेश डाखोरे (वय ३२) हा मूळचा मांडवा फॉरेस्ट येथील रहिवासी असून, उदरनिर्वाहासाठी मेहकर शहरातील गणराज भोजनालयात काम करतो. तो पत्नी आशाबाई आणि चिमुकल्या मुलासह रामनगरातील देशमुख यांच्या वाड्यात भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती आहे.
शुक्रवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अमोल याने दारूच्या नशेत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे डॉ. अमित धांडे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे रेफर करण्यात आले. शासकीय रुग्णवाहिकेतून त्याला बुलढाण्याकडे रवाना करण्यात आले.
अमोल याला दारूचे व्यसन असल्याने कौटुंबिक परिस्थितीमुळे तो काही दिवसांपासून नैराश्यात असल्याची चर्चा परिसरात आहे. याच कारणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने अमोल याचे प्राण वाचले असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.














