देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील जांभोरा येथे विदर्भ संस्कृती सीड्स अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या प्रस्तावित प्रोसेसिंग प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.
सदर प्रकल्प ग्रामपंचायत व संबंधित विभागांकडून आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न घेता सुरू करण्यात आल्याचा आरोप करत संतोष बाळार्जी खडूळ यांच्यासह जांभोरा येथील ११ ग्रामस्थांनी दि. २१ रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व नियमांची पूर्तता करूनच प्रकल्पास परवानगी देण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले.
उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. रामप्रसाद शेळके यांनी भेट देऊन चर्चा केली. चर्चेअंती दिलेल्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. यावेळी जांभोरा सरपंच वत्सलाबाई हुरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.














