चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील वळती येथील सामाजिक कार्यकर्ते आदित्य धनवे यांनी आपला वाढदिवस कोणताही वायफळ खर्च न करता सामाजिक उपक्रमातून साजरा केला. यानिमित्ताने वळती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिली आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
“ज्या शाळेत आपण शिकलो, त्या शाळेला काहीतरी परत देणं ही माझी जबाबदारी आहे,” अशी भावना व्यक्त करत धनवे यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याच शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत असून, ही शाळा गुणवत्तेची परंपरा जपत असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाचे शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले. वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणं नव्हे, तर समाजासाठी काहीतरी सकारात्मक करणं आवश्यक आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून तरुणांनी अशा सामाजिक उपक्रमात पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.













