वाळूची अवैध वाहतूक; १८ ब्रास वाळूसह तीन टिप्पर जप्त आणि लाखो रुपयाचा….!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): रेतीच्या अवैध वाहतुकीविरोधात मेहकर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने २० जानेवारी रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत १८ ब्रास वाळूसह तीन टिप्पर जप्त केले. या संयुक्त कारवाईत एकूण ९१ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.


उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे हे पथकासह गस्त घालत असताना रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मेहकर–जानेफळ मार्गावरील फर्दापूर शिवारात कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान शासनाच्या वैध परवान्यात खोडाखोड करून बनावट पद्धतीने रेती वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी टिप्पर क्रमांक (एम.एच.-२८ बी.वाय. ५९७९) थांबवून तपासणी केली असता त्यातून ६ ब्रास रेती जप्त करण्यात आली. या वाहनासह जप्त मालाची किंमत ४० लाख ४२ हजार रुपये असून, या प्रकरणी जानेफळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, ग्राम गोमेधर शिवारातील जानेफळ–मेहकर मार्गावर रायबा हॉटेलजवळ नाकाबंदी करून दुसरी कारवाई करण्यात आली. येथे पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर क्रमांक (एम.एच.-२८ बी.बी. ९१०२) व (एम.एच.-२८ बी.बी. ९१८१) थांबवले.

तपासणी दरम्यान या दोन्ही वाहनांतून एकूण १२ ब्रास रेती जप्त करण्यात आली. जप्त टिप्पर, वाळू व अन्य साहित्याची एकूण किंमत ५१ लाख ४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी टिप्पर चालक, वाहक व मालकांविरुद्ध मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही कारवायांतून एकूण तीन टिप्पर व १८ ब्रास वाळूसह ९१ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे व अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजिनाथ मोरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश कड यांच्यासह पथकाने केली.


रेतीच्या अवैध वाहतुकीविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!