देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव राजा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीत आमदार मनोज कायंदे समर्थित गटाने जोरदार मुसंडी मारत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. ठाकरे सेनेला सोबत घेत कायंदे गटाने सर्वच महत्त्वाच्या समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले असून, नगरपालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी माधुरी तुषार शिपणे यांची निवड करण्यात आली असून त्या पदसिद्ध सभापती म्हणून कार्यभार पाहणार आहेत. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या उपाध्यक्षपदी वनिता भुतडा, तर बांधकाम समितीच्या सभापतीपदी विष्णू झोरे यांची निवड झाली आहे.
स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी संदीप शिंदे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शेख नमिराबी अतिक, तर शिक्षण समितीच्या सभापतीपदी राजेंद्र खांडेभराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वैशाली कासारे या पदसिद्ध सदस्य म्हणून संबंधित समितीत सहभागी आहेत.
या निवडणूक सभेचे प्रशासकीय कामकाज मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी पाहिले. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण सभा शांततेत पार पडली असून, उपस्थित सर्वांचे आभार मानत सभा संपल्याचे घोषित करण्यात आले.
या निवडीमुळे देऊळगाव राजा नगरपालिकेत आमदार मनोज कायंदे गटाची पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात नगरपालिकेतील निर्णयप्रक्रियेत या गटाचे वर्चस्व राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.














