बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):राज्य शासनाची गाजलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. तांत्रिक कारणांचा बागुलबुवा उभा करून तब्बल ३० हजार महिलांचा लाभ रखडवण्यात आला असून याचा उद्रेक आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय वर पाहायला मिळाला….
लाभ न मिळाल्याने संतप्त झालेल्या खामगाव शहर व तालुक्यातील शेकडो महिलांनी थेट बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिजामाता महाविद्यालय मैदानापासून निघालेल्या या मोर्चात महिलांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
“सगळी कागदपत्रं दिली, केवायसी केलं, आधार लिंक केलं… तरी पैसे कुठं अडकले?” असा सवाल करत महिलांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.
बँक खाते लिंक नाही, अर्जात त्रुटी आहेत, अशी कारणं देत महिलांची फिरवाफिरवी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. ओबीसी महासंघाचे गणेश चौकशे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी प्रतिज्ञापत्र व तक्रार अर्ज सादर करत थेट जिल्हाधिकारी व महिला-बालविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला.
लाभ थांबलेल्या महिलांचा शोध घेऊन तातडीने त्रुटी दूर कराव्यात, रखडलेले सर्व हप्ते त्वरित खात्यात जमा करावेत, महिलांना कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावू नये, अशा ठाम मागण्या यावेळी करण्यात आल्या.
महिलांचा आक्रमक पवित्रा पाहता महिला व बालविकास विभागाने एका महिन्यात तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी दिपक महाजन, प्रकाश घाडगे, मेजर शुभास फेरंग, शेख हुसेन, प्रमोद जावडेकर, आकाश सावळे, राहुल सावळे, अनंता जाधव, संदीप साळवे आदींची उपस्थिती होती.















