मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मोताळा तालुक्यातील राजूर घाटात खडकी फाट्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १९ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडली. पवन अशोक पंडीत येथील कोलवड, तालुका बुलडाणा असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी २० जानेवारी रोजी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथील गजानन तोताराम पंडीत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ जानेवारी रोजी त्यांचा पुतण्या पवन अशोक पंडीत हा एम.एच. २८ / बी.जे. / ८५४८ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना राजूर घाटातील खडकी फाट्यासमोर के.ए. ३६ / ए / ९१६७ क्रमांकाच्या ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव व निष्काळजीपणे चालवून पवन यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात पवन पंडीत गंभीर जखमी झाले असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ बळीराम खंडागळे व पोलीस कॉन्स्टेबल इसाक शेख हे करीत आहेत.











