बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळत असला, तरी आयुष्मान कार्ड मिळवताना अनेक पात्र नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेशनचे धान्य मिळणाऱ्यांनाच आयुष्मान कार्ड दिले जात असल्याची तक्रार असून, यामुळे गरजू नागरिक हैराण झाले आहेत.
अनेकांकडे वैध रेशनकार्ड असूनही नावातील तफावत, अपूर्ण माहिती, तांत्रिक अडचणी तसेच ऑनलाइन प्रणालीतील त्रुटींमुळे आयुष्मान कार्ड तयार होत नाही. परिणामी पात्र लाभार्थीही योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करीत आहेत. रेशनकार्डावर असलेली नावे व ऑनलाइन नोंदणीतील माहिती जुळत नसल्याने अर्ज अडत असल्याचे चित्र आहे.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, शस्त्रक्रिया व रुग्णालयीन सेवा मिळतात. मात्र प्रत्यक्षात रेशनकार्डवरील १२ अंकी क्रमांक अनिवार्य केल्याने अनेक नागरिक अडचणीत सापडले आहेत. हा क्रमांक मिळवणे किंवा प्रणालीत नोंदवताना अडथळे येत असल्याने लाभार्थी ई-सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवत आहेत.
महा ई-सेवा केंद्रांमध्ये आयुष्मान कार्डसाठी रेशनकार्डची सक्ती करण्यात येत असल्याने, ही योजना केवळ रेशनधारकांसाठीच आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात शंभर टक्के आयुष्मान कार्ड तयार करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या असून, शासकीय कर्मचाऱ्यांनाही कार्ड काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तांत्रिक त्रुटी आणि नावातील चुकांमुळे पात्र नागरिक वंचित राहू नयेत, यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अडचणी दूर कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.














