खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव शहरातील सावजी लेआउट परिसरात एका महिलेला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्यानंतर आरोपींनी घरात घुसून महिलेच्या पतीलाही बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगला रितेश वाडेकर (वय २९, व्यवसाय मजुरी, रा. सावजी लेआउट, खामगाव) या १६ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता घरी एकट्याच असताना शुभम हरी इंगळे (वय २५, रा. सुटाळा, खामगाव) व एक अनोळखी इसम त्यांच्या घरी आले. त्यांनी “तुझे पती कुठे आहेत?” अशी विचारणा केली. पती घरी नसल्याचे समजताच आरोपींनी महिलेला मारहाण करत अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.
यानंतर काही वेळाने पती घरी परतल्यानंतर दोन्ही आरोपींनी पुन्हा घरात घुसून पती-पत्नीला बेदम मारहाण केली. यावेळी दोघांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर सावजी लेआउट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३५१ (२), ३५२ व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद मपोहेका प्रिती निर्मळ यांनी केली असून पुढील तपास नापोका सचिन गिते करीत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.











