लोणार सरोवर निर्णायक टप्प्यावर; पाणी वाढले, पण जैवविविधतेला धोका….

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज):उल्कापाताने निर्माण झालेले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रामसर दर्जा प्राप्त असलेले जगातील एकमेव लोणार सरोवर सध्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर उभे आहे. सरोवराची पाणीपातळी गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत असून, त्याचवेळी पाण्यातील रासायनिक घटकांमध्ये सूक्ष्म पण दूरगामी परिणाम करणारे बदल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे बदल केवळ पाण्यापुरते मर्यादित नसून सरोवराच्या जैवविविधतेवर आणि पर्यावरणीय संतुलनावर थेट परिणाम करणारे ठरत आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (जीएसडीए) यांनी २०१९ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत केलेल्या सखोल अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. या अभ्यासात सरोवराच्या पाणीपातळीबरोबरच पाण्याचा पीएच, एकूण विरघळलेले क्षार (टीडीएस), कडकपणा आणि क्लोराईड यांचा दीर्घकालीन आढावा घेण्यात आला.

जीएसडीएच्या ऑक्टोबर २०२५ च्या अहवालानुसार, लोणार सरोवरातील मुख्य पाण्याचा पीएच अजूनही ९ ते ११ दरम्यान असून पाणी अतिक्षारीय स्वरूपाचे आहे. मात्र गोमुख, सीता न्हाणी आणि दर्गा परिसरातील झऱ्यांमध्ये पीएच ७ ते ८ दरम्यान असून हे पाणी तुलनेने गोड आणि नैसर्गिक स्वरूपाचे असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

दरम्यान, सरोवराच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२२ पासून ही वाढ सातत्याने सुरू असून आतापर्यंत पाणीपातळी सुमारे २.८० मीटरने वाढल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पाण्यातील विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. जून ते ऑगस्ट २०२० दरम्यान एकूण विरघळलेले क्षार ४० ते ६७ हजार मिग्रॅ प्रति लिटर इतक्या धोकादायक पातळीवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर हे प्रमाण सातत्याने घटत गेले असून ऑक्टोबर २०२५ मध्ये टीडीएस ३,३०२ ते ३,५०८ मिग्रॅ प्रति लिटर इतके नोंदवले गेले आहे. क्लोराईडचे प्रमाणही २०२० नंतर हळूहळू कमी होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, लोणार सरोवराची जैवविविधता ही त्याच्या अतिक्षारीय पाण्यावरच अवलंबून आहे. येथे आढळणारे दुर्मिळ सूक्ष्मजीव, निळे-हिरवे शेवाळ आणि विशिष्ट जैवरासायनिक साखळी जगात इतरत्र क्वचितच आढळते. क्षारता कमी होत राहिल्यास काही पारंपरिक सूक्ष्मजीव नष्ट होण्याची आणि नवीन प्रजाती उदयास येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोणार सरोवराचे मूळ जैववैशिष्ट्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था (एनजीआरआय), हैदराबाद आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), नागपूर यांच्या अभ्यासानुसार, बाहेरील पाण्याचा शिरकाव हे क्षारता घटण्यामागील कारण नाही. पर्जन्यमानातील बदल, तापमानवाढ, बाष्पीभवन, स्थानिक जलसंचलन, भूगर्भीय रचना आणि हवामानातील चढ-उतार या नैसर्गिक घटकांमुळेच सरोवराच्या पाण्याची रासायनिक रचना बदलत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

अहवालात लोणार सरोवराच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी खडक, माती, पाणी आणि सूक्ष्मजीव यांचा एकत्रित व सखोल अभ्यास आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, क्षारता कमी होणे ही लोणारसाठी सुधारणा नसून जैवविविधतेसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो. त्यामुळे या अद्वितीय सरोवराचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून संरक्षण करण्याची गरज अधिक तीव्र होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!