हाणामारीत गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न….दुसऱ्या घटनेत गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण..! अंढेरा येथे परस्पर तक्रारीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज):अंढेरा येथे क्षुल्लक कारणावरून दोन स्वतंत्र हाणामारीच्या घटना घडल्या. एका घटनेत आरोपींनी गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या घटनेत शेतात रोटावेटर करत असताना गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करण्यात आली. या दोन्ही घटनांप्रकरणी परस्पर तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी एकूण १२ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना १८ डिसेंबर रोजी घडली.

शेतात रोटावेटर करताना मारहाण….

अंढेरा येथील रहिवासी सविता रतीराम दधे (वय ३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक २२ मधील शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटर करत असताना आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवली.
“हे शेत आमचे आहे, येथे रोटावेटर करायचे नाही,” असे म्हणत फिर्यादीला चापट-बुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार हे.कॉ. रावसाहेब मुंडे यांनी
आरोपी रमेश सखाराम केवट, अजय भिका केवट, भिकाजी मानसिंग केवट, सुनिता रमेश केवट, वर्षा रमेश केवट, सरला भिकाजी केवट, मानसिंग भावसिंग केवट (सर्व रा. अंढेरा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम १८९(२), १९१(२), १९०, १२६(२), ११५(२), ३५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

घरासमोर हाणामारी; गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न….

दुसऱ्या घटनेत सुनिता रमेश केवट (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करत लोटपाट व मारहाण केली. यावेळी आरोपींनी फिर्यादीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची मुलगी आली असता, तिचेही हात धरून गळा दाबला व हाताला बोचकारले, असे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी आरोपी मारुतीराम भावसिंग दधे, वच्छला मोतीराम दधे, सविता रतीराम दधे, कविता नारायण दधे, लता कैलास सुनकरे (सर्व रा. अंढेरा) यांच्याविरुद्ध कलम २९६, ११५(२), १८९(२), १९१(२), १९०, ३५१(२), ३५२ भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!