अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली–जालना राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून १ डिसेंबरच्या मध्यरात्री पुन्हा एक भीषण अपघात झाला. देऊळगाव राजाकडून चिखलीकडे जाणाऱ्या कारने रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना रामनगर फाट्याजवळ, मेरा खुर्द फाट्याच्या परिसरात घडली. या भागात दोन्ही बाजूला दाट जंगल असून रस्त्यावर अनेक वळणे असल्याने येथे वारंवार अपघात घडतात.
मृत व्यक्तीचे नाव अंकुश बाळकृष्ण भनगे (वय 38) असे आहे. त्यांची मोटारसायकल क्रमांक एमएच 38 जे 8369 ला कार क्रमांक एमएच 19 सीयू 7454 ने धडक दिली.
अपघातानंतर सुखदेव सखाराम लेंडे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि कार चालकाविरुद्ध बीएनएस कलम 106, 281, 125(a), 125(b) अंतर्गत गुन्हा दाखल केला.











