मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) —
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने एका तरुण कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत प्रवास करणारी महिला गंभीर जखमी झाली आहे. ही दुर्दैवी घटना सोमवारी, दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २९ एआर ५७९२ क्रमांकाची कार नागपूरहून मुंबईकडे जात असताना, चॅनेल क्रमांक २६२.०० मुंबई कॉरिडॉरवर समोर असलेल्या अज्ञात ट्रकला मागून जोरदार धडकली. या भीषण अपघातात जितू नंदा (वय ३५, रा. यवतमाळ) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेल्या सोनी पांडे (वय ३०) या गंभीर जखमी झाल्या.
अपघातानंतर कारचा अक्षरशः चुराडा झाला होता. घटनेची माहिती मिळताच फर्दापूर येथील महामार्ग पोलिस उपकेंद्राचे उपनिरीक्षक राऊत हे सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी महिलेला रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले.
दरम्यान, मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास डोणगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.











