मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज)– किरकोळ कारणावरून कधी हाणामारी होईल याचा नेम राहिला नाही. मोताळा शहरात दारूच्या पैशावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून, या प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी पिता–पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे.
निलेश रामदास रायपूरे (रा. खरबडी रोड, मोताळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मोताळा येथील आठवडी बाजारात प्रदीप जैस्वाल यांच्या देशी दारूच्या दुकानासमोर संतोष दाभाडे आणि त्यांचा मुलगा यांनी दारूच्या पैशाच्या वादातून काठीने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाला असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी संतोष दाभाडे व त्यांच्या मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३२४(२), व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अशोक आडोकार करत आहेत.











