दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) :
सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा जिल्हा परिषद सर्कल यंदाच्या निवडणुकीत प्रचंड गाजणार आहे. कारण या सर्कलमध्ये दिग्गज नेत्यांच्या समर्थकांमध्ये हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. लोकजागर परिवाराचे प्रविण गिते यांच्या राजकीय प्रवेशानंतर या भागातील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत, आणि त्यामुळे अनेक नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
या सर्कलमध्ये किनगावराजा, निमगाव वायाळ, हिवरखेड पुर्णा, तबेगाव, वाकद जहाँगीर, वाघजाई, वाघाळा, राहेरीखु, उमरद, पळसखेड चक्का, पिंपळगाव लेंडी, बारलिंगा, शेलगाव राऊत यासह एकूण २८ गावे समाविष्ट आहेत. हा भाग अत्यंत दुर्गम असल्याने प्रत्येक उमेदवाराला गावागावात पोहोचण्यासाठी चांगलीच दमछाक होणार आहे.
राजकीय पार्श्वभूमी..!
१९९७ पासून या सर्कलमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी आपली छाप उमटवली आहे. प्रमिलाताई सानप, शारदा वाघ, यमुना वाघ, डॉ. शिल्पा कायंदे, विनोद वाघ यांसारख्या नेत्यांनी येथे विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे विनोद वाघ यांनी सलग दोन कार्यकाळात विजय मिळवून आपली मजबूत पकड सिद्ध केली होती. नंतर २०१७ मध्ये त्यांच्या आई भाजपाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या.
नव्या निवडणुकीत नवे चेहरे..
२०२५ मध्ये हा गट सर्वसाधारण झाला असून अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांचा मुकाबला पाहायला मिळणार आहे. लोकजागर परिवाराचे प्रमुख प्रविण गिते यांनी नुकताच आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन समाजकार्यात प्रवेश केला आहे. त्यांचे गाव वाघाळा हे याच गटात असल्याने त्यांनी निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे.
त्यांचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी घट्ट संबंध असल्याने ते कोणत्या पक्षाच्या झेंड्याखाली उतरतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संभाव्य उमेदवारांची नावे..!
भाजपकडून – विनोद वाघ, सुनील कायंदे (भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष), अॅड. सचिन आंधळे, डॉ. रामेश्वर नागरे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – अरुण वाघ, डॉ. शिवानंद जायभाये, विठ्ठल गायके, प्रभाकर देशमुख, विनोद हरकळ
अपक्ष किंवा नवे चेहरे – प्रविण गीते (लोकजागर परिवार)
अनेकांचे पक्ष निश्चित नसले तरी जो पक्ष उमेदवारी देईल, त्याचा झेंडा हाती घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.
राजकीय प्रतिष्ठेचा सवाल :
या सर्कलमध्ये माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार तोताराम कायंदे आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शेतकरी योद्धा कृती समितीचे महत्वाची भूमिका…!
किनगाव राजा सर्कल मध्ये भावी उमेदवार निवडून येण्यासाठी आता शेतकरी योद्धा कृती समिती ही संघटना स्थापन आहे त्यामुळे ही संघटना निर्णायक भूमिका ठरणार आहे…!













