खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :
कामगार कल्याण कार्यालयात आयोजित घरगुती भांडे वाटप कार्यक्रमात नंबर लावण्याच्या कारणावरून वाद झाल्याने एका युवकावर दगडफेक करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना शुक्रवारी सकाळी खामगाव शहरात घडली असून, या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकी गणेश पारधे (वय २६, रा. महाकाल चौक, खामगाव) हा युवक आपल्या आजीसोबत भांडे वाटप कार्यक्रमासाठी एमआयडीसी परिसरातील कामगार कल्याण कार्यालयाच्या मैदानावर आला होता. सकाळी साडे नऊच्या सुमारास नंबर लावण्यावरून त्याचा आरोपी आशिष जगदीश अहीर (रा. शिवाजी वेस, खामगाव) याच्याशी वाद झाला.
वाद चिघळल्याने आरोपीने विकीला लोटपाट करत दगडाने डोक्यावर मारहाण केली, यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
फिर्यादी विकी पारधे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आशिष अहीर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.











