साखरखेर्डा(बुलडाणा कव्हरेज न्युज) साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या शिंदी येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने दीपावलीच्या दिवशी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शिवाजी माणिकराव बुरकूल वय ६५ वर्ष हे शेतात दुपारच्या सुमारास शेतात गेले होते. दरम्यान वडील घरी का आले नाही म्हणून मुले शोधण्यासाठी त्यांना शेताकडे गेले असता त्यांच्या बाजूला कीटकनाशक औषधाची बाटली आढळून आली. त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय मुलांना प्रथम आला. मुलांनी साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल परिहार यांनी बुलढाणा जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. बुलढाणा येथे उपचार सुरू असताना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी शिवाजी बुरकूल यांचे निधन झाले.
ग्राम महसूल अधिकारी लखन राजपूत यांनी प्राथमिक अहवाल तयार करून तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे पाठविला आहे. शिवाजी बुरकूल यांच्यावर एका खाजगी पतसंस्थेचे ३ लाख कर्ज असून कर्ज वसुलीसाठी पतसंस्थेने नोटीस बजावली होती. परंतू पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शिंदी भागातील शेती खरडून गेली आहे. पिक काढणीला आले असता अतिवृष्टीने सोयाबीन शेंगाला कोंब फुटले, त्यात खाजगी पतसंस्थेची पठाणी वसूली यामुळे शेतकरी वैतागले आहेत. शिवाजी बुरकुल यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, मुलगी असा परिवार आहे.













