बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — दिवाळी खरेदीची लगबग सुरू असताना चोरट्यांनीही बाजारात मोर्चा वळवला आहे. रविवारी बुलढाणा शहरातील आठवडी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी पर्स चोरीचा प्रयत्न केला, मात्र सतर्क महिलेच्या धाडसामुळे हा प्रयत्न फसला.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेला खरेदीदरम्यान तिच्या पर्सभोवती फिरणाऱ्या अनोळखी महिलेचा संशय आला. काही वेळातच ती महिला पर्स उचलण्याचा प्रयत्न करताच पीडित महिलेने तत्परतेने तिला पकडले. त्यानंतर परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिकही मदतीला धावून आले.
घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिस निरीक्षक रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासात पकडलेल्या महिलेसोबत आणखी एक साथीदार असल्याचेही समोर आले. पोलिसांनी दोघींनाही ताब्यात घेतले आहे.सदर घटनेत अद्याप औपचारिक तक्रार दाखल नसली तरी पोलिसांनी दोन्ही महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.











