चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – सततच्या नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी टाकरखेड हेलगा (ता. चिखली) येथे घडली.
मृत शेतकऱ्याचे नाव गोपाल वसंता बराटे (वय २९) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल बराटे यांनी आपल्या शेतीसाठी एका पतसंस्थेतून सहकर्जदार म्हणून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, गेल्या काही हंगामांपासून सलग नापिकी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्याच्यावर कर्जाचे ओझे वाढत गेले आणि तो मानसिक नैराश्यात गेला होता.
मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
गोपालच्या मृत्यूमुळे त्याच्या वृद्ध आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेचा कर्ज तपशील तलाठ्यांनी तहसीलदारांकडे सादर केला असून, पुढील तपास ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुमेरसिंग ठाकूर करीत आहेत.











