चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील गुंजाळा गावात एका २० वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी घडली. मृत शेतकऱ्याचे नाव संतोष शंकर केदार असे आहे.
संतोष याचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते आणि त्याला ४ महिन्यांची मुलगी आहे. त्यांच्या कुटुंबाकडे सुमारे ५ एकर शेती असून त्यावर एकूण ३ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये गायी खरेदीसाठी, ट्रॅक्टरसाठी आणि शेतीसाठी घेतलेले कर्ज समाविष्ट आहे.
यावर्षी त्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. मात्र, ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेत संतोष सतत राहत होता. अखेर नैराश्यातून त्याने गावालगतच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
हा प्रकार शेतमालकांच्या पत्नी शोभाबाई मोरे यांच्या नजरेस आला. त्यांनी लगेचच गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर पोलिस व महसूल विभागाने पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.
घरातील कर्ता तरुण शेतकरी आणि त्याच्या ४ महिन्यांच्या मुलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.











