बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी बुलडाण्यात २५ सप्टेंबर रोजी बंजारा समाजाने भव्य मोर्चा काढला.
हा मोर्चा जिजामाता प्रेक्षागृहातून सुरू झाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. ” एक गोर, सव्वा लाखेर जोर”अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. जिल्ह्यातील विविध भागांतून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाच्या सुरुवातीला समाजातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
१० जानेवारी १९५० रोजी सीपी अॅण्ड बेरार सरकारने बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची शिफारस केली होती.
१८७१ ते १९३१ च्या जनगणना अहवालांमध्ये बंजारा हा स्वतंत्र आदिवासी समाज म्हणून नोंदला गेला आहे.
तेलंगणात हा समाज एसटी, कर्नाटकात एससी, तर इतर राज्यांत वेगवेगळ्या प्रवर्गांत समाविष्ट आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही न्याय मिळालेला नाही.
मागणी
समाजाने सरकारला मागणी केली की –
हैदराबाद राजपत्राच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला तातडीने अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे.
आंध्रप्रदेश व तेलंगणा प्रमाणेच महाराष्ट्रातही हा समाज एसटी प्रवर्गात सामील व्हावा.
राज्य शासनाने केंद्राकडे शिफारस करून याबाबत निर्णय घ्यावा.
असंतोष व इशारा
समाजाचे म्हणणे आहे की, पूर्वी आंध्रप्रदेशात जे जिल्हे होते (नांदेड, परभणी, संभाजीनगर, उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर, हिंगोली) तिथे बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळत होते. विविध आयोगांनीही हा समाज आरक्षणासाठी पात्र असल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र आरक्षण न मिळाल्याने समाज वंचित राहिला असून मोठा अन्याय झाल्याची भावना समाजात आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात चेतावणी देण्यात आली की – “आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास यापेक्षाही मोठ्या स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल.”
एक गोर, सव्वा लाखेर जोर”अशा घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दनदनून गेला! बंजारा समाजाचा भव्य मोर्चा….
Published On: September 25, 2025 6:52 pm













