चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता विद्याधर महाले यांच्या घरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी आज गणेशदर्शनासाठी भेट दिली. घरगुती, भक्तिमय वातावरणात झालेल्या या दर्शन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी गणरायाच्या चरणी राज्यातील जनतेच्या कल्याणाची प्रार्थना केली.
यावेळी आमदार सौ. श्वेता महाले यांनी आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीवर सहानुभूती व्यक्त करून मदत व पुनर्वसन उपाययोजनांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे, आमदार सौ. श्वेता महाले यांनी मागील वर्षी लालबागच्या राजाच्या चरणी “देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत” अशी मनोकामना व्यक्त केली होती. आज फडणवीस स्वतः त्यांच्या घरी गणेशदर्शनासाठी येणे हा त्या मनोभावनेला मिळालेला एक वेगळाच प्रतिसाद असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
या विशेष भेटीमुळे गणेशोत्सवाचा उत्साह दुणावला असून भक्तिभावाबरोबरच लोकहिताच्या चर्चेचा अर्थपूर्ण संगम घडला असे प्रतिपादन आमदार सौ श्वेता महाले यांनी केले.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने गणेशोत्सवाचा उत्साह आणखीनच वाढला असून परिवारातील सर्व सदस्यांसोबत त्यांनी साध्या पण मनमिळाऊ वातावरणात संवाद साधला. घरच्यांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून प्रसाद अर्पण केला.असे श्री विद्याधर महाले म्हणाले.
गणेशभक्ती, परंपरा आणि आपुलकी यांचा सुंदर संगम घडवणारा हा क्षण उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. याप्रसंगी मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव श्री विद्याधर महाले तसेच राजन्य महाले उपस्थित होते













