चिखली/ सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार आणि चिखली या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरवडल्या गेल्या, उभी पिके वाहून गेली, विहिरी बुजल्या, गोठे कोलमडले आणि अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले. काही गावांमध्ये पुराचे पाणी थेट घरांमध्ये घुसले, ज्यामुळे शेकडो कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या संकटग्रस्त भागात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोमठाणा आणि शिंदीसह अनेक गावांना भेटी देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांना आधार दिला. शिंदी गावात तर एकूण २६ घरांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रात पावसाचा कहर! 8.5 लाख हेक्टर पिके उद्ध्वस्त, 10 जणांचा मृत्यू, पंचनामे कधी होणार?
तुपकर यांनी या परिस्थितीवर बोलताना सांगितले की, शेतकऱ्यांवर सतत संकटे येतच आहेत. आधी शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही, मग कर्ज काढून पेरण्या केल्या. त्यानंतर हुमणी अळीने सोयाबीनचे मोठे नुकसान केले आणि आता या मुसळधार पावसाने सर्व काही उद्ध्वस्त झाले. त्यांनी सरकारकडे जोरदार मागणी केली की, बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. पंचनाम्याच्या फंदात न पडता, सरसकट आणि कोणत्याही अटीशिवाय १०० टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. तुपकर यांनी चेतावणीही दिली की, जर सरकारने त्वरित मदत केली नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल.













