चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – चिखली तालुक्यातील इसरूळ गावात वैयक्तिक वादातून एका ३५ वर्षीय तरुणाचा गळा कापून खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शनिवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणावर धारदार चाकूने हल्ला करून त्याच्या गळ्यावर गंभीर वार करण्यात आला. जखमीला तातडीने चिखली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.घटनेनंतर आरोपी शे. अकबर शे. कमाल याने गावचे सरपंच सतीश पाटील भुतेकर व पोलीस पाटील जयपाल वायाळ यांना, “मी समाधान भुतेकर याचा गळा कापला आहे, आता मी पोलीस स्टेशनला जातो” असे सांगितले. त्यानंतर तो स्वतःहून अंढेरा पोलीस स्टेशनला जाऊन हजर झाला.
या घटनेमुळे इसरूळ गावात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी याच गावात एका महिलेचा खून झाला होता, तेव्हाही गाव हादरले होते.
पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे प्रभारी आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार जारवाल व जमदार देढे करत आहेत.