उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज) – भरधाव वेगाने जाणाऱ्या कारच्या धडकेत टोल नाक्यावर काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे अकरा वाजता, टोल नाक्यापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर घडली.
मृताचे नाव विशाल तेजराव वानखेडे (रा. अमडापूर) असे आहे. ते टोल नाक्यावर दुपारी ४ ते रात्री १२ या शिफ्टमध्ये काम करत होते. मात्र, प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी रात्री ११ वाजता सुपरवायझरची परवानगी घेऊन पायी घरी निघाले.
दरम्यान, खामगावहून चिखलीकडे येणाऱ्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली व कारखाली चिरडले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळ सोडले. टोल बूथवरील कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून वानखेडे यांना चिखली ग्रामीण रुग्णालयात हलवले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
टोल कर्मचाऱ्यांना अपघातग्रस्त कार (एमएच ४१ एएस २२०७) टोचन करून खामगावकडे नेत असल्याचे आढळले. त्यांनी अमडापूर पोलिसांना कळवून गाडीचा पाठलाग केला आणि वैरागड येथे ती पकडली. वाहनाच्या खाली रक्ताचे डाग व केस सापडल्याने हा तोच अपघातातील वाहन असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी मृतकाचा भाऊ प्रकाश तेजराव वानखेडे यांच्या तक्रारीवरून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.