चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यात हुमणी अळीचा प्रकोप वाढतच चालला आहे. अनेक गावांतील शेतकऱ्यांची पिके या अळीमुळे उध्वस्त होत असून, त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. या गंभीर प्रश्नाची शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहिली.
कृषी विभागाने मार्गदर्शन केल्यानंतर सुद्धा अळीवर नियंत्रण मिळवता येत नसल्याचे व याबाबत नुकसान भरपाई ची कसलीही तरतुद नसल्याचे प्रशानाकडून सांगीतले जात असल्याने हा प्रश्न शासन स्तरावरील असल्याने शेतकऱ्यांसह सरनाईक यांनी आमदार सौ श्वेता महाले यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे माहिती देत मागणी केली होती. या मागणीची दखल तेवढ्याच तत्परतेने आमदार महालेंनी घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनात आक्रमक होत हुमनी अळीचा प्रश्न शासनदरबारी लावून धरल्याने यावर कृषीमंत्री यांनी पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले आहे.
आमदार श्वेता महाले यांनी घेतली त्वरेने दखल
शेतकऱ्यांच्या या मागणीची तातडीने दखल घेत आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत ‘पाॅइंट ऑफ इन्फर्मेशन’च्या माध्यमातून हुमणी अळीचा मुद्दा जोरदारपणे मांडला. त्यांनी कृषीमंत्र्यांकडे मागणी केली की, हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे,शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,अळीची मदत मिळण्यासाठी निर्णय व्हावा त्याचप्रमाणे या अळी व कीड रोगचा पीकविमा योजनेत समावेश करण्यात यावा,अशी मागणी देखील त्यांनी लावून धरली
कोणत्या गावांमध्ये संकट?
देऊळगाव घुबे, मेरा बु., कोनड खुर्द, खंडाळा मकरध्वज, शेलगाव जहाँगीर, मुंगसरी, अन्ची, तेल्हारा, मेरा खुर्द, अंत्री खेडेकर, सोमठाणा, दिवठाणा या गावांमध्ये सोयाबीनची पीकं रोप अवस्थेत असताना हुमणी अळीने मुळे खाऊन टाकली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे.
फवारण्या करूनही अळीवर नियंत्रण नाही
शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार फवारण्या केल्या, पण अळीचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
शेजारील जिल्ह्यांतही परिस्थिती गंभीर
फक्त बुलडाणा नव्हे, तर शेजारील जिल्ह्यांमध्येही हुमणी अळीचा प्रकोप आहे. त्यामुळे राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार श्वेता महाले यांनी केली.













