चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा परिसरातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि त्यानुसार अनेक ठिकाणी चांगला पाऊसही झाला. मात्र, काही भागात अतिवृष्टीमुळे ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले. अशा कठीण परिस्थितीत ‘रोही’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीलगायींच्या कळपांमुळे शेतीला नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
रोही, म्हणजेच नीलगाय, हा प्राणी कळपाने राहणारा आणि वजनाने जड घोड्यासारखा धिप्पाड असल्याने शेतात प्रवेश केल्यावर पिकांची मोठ्याप्रमाणावर नासाडी करतो. त्यामुळे एकट्या शेतकऱ्याकडून त्यांना पळवून लावणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. याशिवाय, नीलगायींमुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी रस्त्यावर येणाऱ्या नीलगायींमुळे वाहनचालकांचे अपघात होतात, ज्यामध्ये काहींचा जीवही गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून चिखली, देऊळगाव राजा आणि सिंदखेडराजा या भागांत नीलगायींची संख्या झपाट्याने वाढली आहे. एका कळपात 50 ते 75 नीलगायी असतात आणि त्या शेतात घुसल्यास क्षणात किमान एक एकर पिकाची नासाडी होते. या प्राण्यांची शेंडे आणि बुडासकट पिके खाण्याची सवय असल्याने आणि शेतातून कळपात गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले असून त्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.
मिसळवाडीतील वारकऱ्याची रुईछत्तीस गावच्या शिवारात आत्महत्या; गावात शोककळा
काही शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी उपाय म्हणून तारांचे किंवा लाकडे उभे करून जाळीचे कुंपण केले आहे, परंतु या धिप्पाड प्राण्यांपुढे त्यांचा अजिबात टिकाव लागत नाही.
या भागातील काही शेतकऱ्यांनी वनविभाग आणि तहसीलदारांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, वनविभागाकडून नीलगायींच्या बंदोबस्तासाठी कोणतेही ठोस उपाय केले जात नाहीत. प्रशासनाकडूनही या समस्येकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
यापूर्वीही या परिसरात नीलगायींमुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. तेव्हाही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, पण त्यावर कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. आता या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, तरीही प्रशासन आणि वनविभागाकडून यावर कोणतीही प्रभावी कारवाई झाल्याचे दिसत नाही.
स्थानिक नेते आणि शेतकरी नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींकडूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कोणताही नेता प्रशासनाला याबाबत जाब विचारण्यास तयार नाही. त्यांचे लक्ष फक्त राजकीय गोष्टी आणि निवडणुका जिंकण्याच्या रणनीतींवर केंद्रित असल्याचे दिसते. शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे त्यांचे लक्ष नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
शेतकरी सध्या आधीच अतिवृष्टी आणि दुबार पेरणीच्या संकटातून जात असताना नीलगायींचा त्रास त्यांच्यासाठी नवीन संकट ठरत आहे. या प्राण्यांमुळे सोयाबीन, तूर, कापूस यांसारख्या खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांनी वनविभागाला नीलगायींची संख्या नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणीही जोर धरत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जर प्रशासनाने आणि वनविभागाने यावर त्वरित कारवाई केली नाही, तर त्यांना एकजुटीने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. नीलगायींच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
3 thoughts on “शेतकऱ्यांवर नवे संकट: रोहयांकडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष”