चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पंढरपूर वारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मिसळवाडी येथे एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याची दु:खद घटना ३० जून २०२५ रोजी सकाळी समोर आली. सुखदेव लक्ष्मण रावे (वय ६२) यांनी रुईछत्तीस गावच्या शिवारातील एका शेतात कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
सुखदेव रावे मूळचे चिखली तालुक्यातील वरखेड गावचे रहिवासी होते. गेल्या २५ वर्षांपासून ते मिसळवाडी येथे वास्तव्यास होते. त्यांनी शेळगाव आटोळ येथे केस कर्तनाचे दुकान सुरू केले होते आणि हा व्यवसाय त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत चालवत होता. अनेक वर्षांपासून सुखदेव रावे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत होते. वारकरी संप्रदायात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती आणि त्यांच्या भक्तिमय जीवनशैलीमुळे ते गावात मानले जात होते.
काही कारणामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक तसेच कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागत होते, अशी चर्चा गावात आहे. या तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वारकरी संप्रदायात भक्ती आणि समर्पणाचा आदर्श घालणाऱ्या सुखदेव रावे यांनी असा निर्णय घेतल्याने गावकरी आणि वारकरी बांधवांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही घटना सामाजिक समस्यांवर विचार करण्यास भाग पाडणारी आहे.