डोड्रा (नंदकिशोर देशमुख– बुलढाणा कव्हरेज न्यूज): डोड्रा येथील ३६ वर्षीय शेतकरी जनार्दन नारायण पवार यांनी शेतीतील सततच्या अपयशामुळे आणि आर्थिक संकटामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोड्रा गावात घडली.
डोड्रा शिवारात जनार्दन पवार यांच्याकडे दोन एकर शेती आहे. यंदा त्यांनी दे माही येथील सेंट्रल बँकेकडून ५० हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. या कर्जाच्या पैशातून त्यांनी एक एकर शेतात सोयाबीन आणि दुसऱ्या एकरात आल्याची पेरणी केली होती. मात्र, सोयाबीन बियाण्याची उगवणच झाली नाही, त्यामुळे त्यांनी दुबार पेरणीचा विचार सुरू केला. त्यातच २३ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने त्यांच्या एक एकरातील आल्याचे बियाणे पूर्णपणे वाहून गेले. यामुळे बँकेचे कर्ज, घरखर्च आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.
या सततच्या अपयशामुळे आणि आर्थिक ओझ्याखाली जनार्दन पवार यांच्या मनावर मोठा ताण आला. त्यामुळे ते नैराश्याच्या गर्तेत अडकले. घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधून त्यांनी घराचा दरवाजा बंद केला आणि छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार देढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्यासह इतर प्रक्रिया पूर्ण केली. जनार्दन यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.