छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : वाळूजजवळील नायगावमध्ये आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. फुले तोडण्यासाठी घराच्या धाब्यावर गेलेल्या ३५ वर्षीय महिलेला विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, २१ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव सुनैनादेवी अनिल पंडित (वय ३५, रा. बकवालनगर, नायगाव) असे आहे.सुनैनादेवी या धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्या दररोज मंदिरात जाऊन पूजा करत असत. आज सकाळीही त्या देवासाठी फुले तोडण्यासाठी धाब्यावर गेल्या होत्या.
मात्र रात्रीच्या पावसामुळे धाब्यावर पाणी साचले होते आणि त्यात वीजप्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला. त्याच क्षणी त्या कोसळल्या.घटनेनंतर पती अनिल पंडित यांनी त्यांना तत्काळ बजाजनगर येथील खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
पंडित कुटुंब मूळचे बिहार राज्यातील आहे. सुनैनादेवी यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी बलहिदा, जिल्हा छपरा येथे अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती वाळूज पोलिसांनी दिली.