इसरूळ (भिकनराव भुतेकर- बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला रविवारी मध्यरात्री अपघात झाला. लातूरहून बुलडाणा जिल्ह्यात येत असताना, वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्याजवळ रात्री १२.३० ते १ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगात आलेल्या आणि मद्यधुंद अवस्थेतील ट्रकचालकाने तुपकर यांच्या इनोव्हा गाडीला जोरदार धडक दिली.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान, इसरूळ येथे संत चोखोबा रायांच्या पुण्यतिथी निमित्त गेल्या आठ दिवसांपासून सप्ताह सुरू आहे. आज ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. या कीर्तनाच्या शेवटी बोलताना तुपकर म्हणाले, “आज मी सुखरूप आहे, यामागे शेतकऱ्यांचा आणि साधू संतांचा आशीर्वाद आहे.
आजपर्यंत तीन वेळा अपघात झाले, पण हा सर्वात मोठा होता. तरीही देवाच्या कृपेने मी वाचलो. मी कधीच कोणाचे वाईट केले नाही.”या अपघातानंतर त्यांच्या सुरक्षिततेबद्दल शेतकरी वर्गात आणि समर्थकांमध्ये मोठा दिलासा व्यक्त केला जात आहे.