बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेतकरी नेते आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविकांत तुपकर यांचा वाढदिवस येत्या १३ मे रोजी आहे. दरवर्षी साधेपणाने वाढदिवस साजरा करणारे तुपकर यांनी यंदा आपला वाढदिवस जल्लोषाऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी ते आपल्या कुटुंबासह घराच्या अंगणात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत एकदिवसीय उपोषण करणार आहेत.
या उपोषणामागे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला योग्य भाव, बँकांनी केलेले होल्ड हटवणे, जबरदस्तीची वसुली थांबवणे आणि शेतीसाठी मजबूत संरक्षण व्यवस्था यासारख्या प्रमुख मागण्या आहेत. यासोबतच, नुकत्याच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहण्यासाठीही हा उपवास आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज इसरूळ येथे; संत चोखोबाराय पुण्यतिथी सोहळ्यात होणार सहभागी
रविकांत तुपकर यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांवर सध्या संकटांचा डोंगर कोसळला आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत, आणि बँकांकडून जबरदस्तीने वसुली होत आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी आणि शेतीला आधार देणारी ठोस पावले उचलावीत, यासाठी हे उपोषण आहे.”
ते पुढे म्हणाले, “देशातील वातावरण सध्या अस्थिर आहे. पहलगाम हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे मला योग्य वाटत नाही. त्याऐवजी मी हा दिवस शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समर्पित करत आहे.”
तुपकर यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचे बॅनर, पोस्टर, फलक किंवा पुष्पगुच्छ न आणण्याचे आवाहन केले आहे. “मला कोणत्याही भेटवस्तूंची गरज नाही. तुम्ही या उपोषणात सहभागी व्हा, माझ्या आंदोलनाला पाठिंबा द्या, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असेल,” असे त्यांनी भावनिक आवाहन केले आहे.
डॉक्टरचे अपहरण; तीन लाखांची खंडणी उकळून डॉक्टरांचा थरारक पलायन प्रवास…
ते उपोषणस्थळी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार असून, यावेळी कोणताही जल्लोष किंवा उत्सव साजरा केला जाणार नाही, असे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे.
रविकांत तुपकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर करत यंदाचा वाढदिवस साधेपणाने आणि आंदोलनाच्या माध्यमातून साजरा करण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी लिहिले, “१३ मे हा माझा वाढदिवस आहे, पण तो साजरा करणे मला कधीच आवडले नाही. पोस्टरबाजी, बॅनर आणि जल्लोष यापेक्षा मी हा दिवस नेहमीच सामान्य दिवसासारखा कार्यासाठी समर्पित केला आहे. यावर्षी तर पहलगाम हल्ला आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणींमुळे वाढदिवस साजरा करणे अशक्य आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबासह घराच्या अंगणात उपोषण करणार आहे. तुम्ही मला साथ द्या, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट असेल.”
तुपकर यांचे हे उपोषण शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि सरकारचे लक्ष त्यांच्या मागण्यांकडे वेधण्यासाठी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, पीकविम्याच्या हक्कासाठी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. यंदाचा वाढदिवसही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पित करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
तुपकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. उपोषणादरम्यान ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुढील रणनीती ठरवतील.
1 thought on “वाढदिवसाला जल्लोष नको- माझ्या जन्मदिवसाला घराच्या अंगणातच करणार कुटुंबासह एकदिवसीय उपोषण!”