घारोड (बुलडाणा कव्हरेज न्युज): घारोड शिवारातील नाल्यावर जलसंधारण विभागाने सुमारे दोन वर्षांपूर्वी गेट बंधारा बांधला; मात्र आजपर्यंत या बंधाऱ्यावर गेट बसविण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. विशेष म्हणजे, सदर बंधारा अद्याप ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आलेला नसल्याने त्याचा अपेक्षित लाभ परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
सध्या परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत बंधाऱ्यावर गेट नसल्यामुळे पाण्याची अपेक्षित साठवणूक होत नसल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनावरही त्याचा परिणाम होत असून, शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही बंधाऱ्याचा अपेक्षित उपयोग होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी तसेच जलसंधारण विभाग, बुलडाणा यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. बंधाऱ्यावर तात्काळ गेट बसविण्यात यावे, तसेच सदर बंधारा ग्रामपंचायतीकडे अधिकृतरीत्या हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच बंधारा बांधकामाच्या कामाची आणि त्यानंतरच्या कार्यवाहीची संबंधित अधिकारी व कंत्राटदारामार्फत चौकशी करण्यात यावी. दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी आणि चौकशीचा अहवाल ग्रामपंचायतीला देण्यात यावा, अशी मागणीही ग्रामपंचायतीने केली आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन बंधाऱ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.













