डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील २८ वर्षीय विवाहित महिला घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला एका तरुणाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा आरोप तिच्या पतीने केला असून, डोणगाव पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. त्यानंतर महिलेच्या पतीने डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीत विठ्ठलवाडी येथील नितीन जनार्दन डुकरे (वय २४) याने आपल्या पत्नीला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तिला अपहरण करून गुप्तपणे व बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्याचा उद्देश असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी नितीन डुकरे याच्याविरुद्ध अपहरणासह संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डोणगाव पोलिस करीत असून, बेपत्ता महिलेचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.













