चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा-चिखली मार्गावर केळवदजवळ (Kelwad Accident) गुरुवारी (11 एप्रिल) संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने कारमधील युवक व युवती गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर चिखली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना केळवदजवळील हनुमान मंदिराच्या वळणावर घडली. समोरून येणाऱ्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. अपघातात कारचा पुढचा भाग अक्षरशः चुराडा झाला असून, ट्रकच्या समोरील कोपऱ्यालाही मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताच्या वेळी कारमध्ये ऋषिकेश बडगे हा चालक आणि एक तरुणी हे दोघेच होते. दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने चिखली येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघातानंतर काही वेळातच रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांनाही खबर दिली.
दरम्यान, अपघातग्रस्त दोघांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.