अमरावती (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क):
अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. बुधवारी न्यायाधीश वाय. ए. गोस्वामी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
या प्रकरणातील आरोपीचे नाव नीतेश काशिनाथ आडे (वय २६, रा. पिंपळखुटा) असे आहे. ही घटना १ जानेवारी २०२० रोजी अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पीडित मुलगी अल्पवयीन असून महाविद्यालयात शिक्षण घेत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नीतेश हा पीडित मुलीशी वारंवार बोलत होता. घटनेच्या दिवशी मुलगी मंदिरात गेली असता आरोपीने तिचा पाठलाग करून सोबत येण्याचा आग्रह धरला. मुलीने नकार दिल्यानंतर आरोपीने रस्त्यावरच तिच्यावर हल्ला केला व जबरदस्तीने तिला एका गावात नेले. तेथे आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिला आपल्या महिला नातेवाईकांकडे ठेवले.
या घटनेची तक्रार पीडितेने दिल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी अपहरण, अत्याचार व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक मनीषा सामतकर यांनी केला. तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. सोनाली क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या.
सर्व पुरावे व युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीस पोक्सो व अत्याचाराच्या गुन्ह्यात दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीस ३ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
तसेच न्यायालयाने पीडित मुलीस ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले असून, त्यापैकी २५ हजार रुपये दोन महिन्यांत न्यायालयात व उर्वरित २५ हजार रुपये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात जमा करण्याचे आदेश आरोपीस देण्यात आले आहेत.













