
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून त्याचा थेट फटका आता लहानग्यांनाही बसू लागला आहे. संत नगरी शेगावा तून आलेली एक धक्कादायक आणि दुःखद वार्ता सध्या सगळीकडे खळबळ उडवत आहे. अवघ्या ११ वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा उष्माघातामुळे मृत्यू (Ushmaghat Death) झाल्याची चर्चा सध्या शेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर होत आहे.
संस्कार सोनटक्के असं या दुर्दैवी विद्यार्थ्याचं नाव असून तो संत गजानन महाराज ज्ञानपीठ, शेगाव येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता. प्रखर उन्हामुळे त्याची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी अकोला येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताने मृत्यू झाल्याची ही पहिली घटना ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संस्कार सोनटक्के दोन दिवसांपूर्वी शाळेतून घरी आल्यानंतर त्याला जोरदार उलट्या मलमल (ओकार्या) होऊ लागल्या. त्याला लगेचच शेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचारा नंतरही तब्येतीत काही सुधारणा न झाल्याने, त्याला दुसऱ्या एका मोठ्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं.
तिथेही प्रकृतीत फरक न पडल्याने, शेवटी त्याला अकोला येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्याने अखेरचा श्वास घेतला.शेगाव शहरात यंदा एप्रिल महिन्यातच तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सियस पर्यंत गेले आहे. या प्रखर उन्हामुळे शाळकरी मुलांचं आरोग्य धोक्यात येत असल्याची भीती आता पालकांमध्ये दिसून येत आहे.
Guptadhan: गुप्तधनासाठी काळी जादू? रोहडा-गांगलगाव रस्त्यावरील ओसाड गावात संशयास्पद खड्डा…
या घटनेमुळे शेगाव शहरासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन हादरलं आहे.या दुर्दैवी घटनेमुळे संत नगरीत शोककळा पसरली असून, उष्माघातासारख्या संकटापासून शाळकरी मुलांना वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी अधिकृत माहिती दिलेली नसली तरी, महसूल विभागातील वरिष्ठ सूत्रांनी या घटनेला अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.