चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील पळसखेड दौलत शिवारात मंगळवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रविन जगदेव जाधव (वय २९, रा. पळसखेड दौलत) यांनी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले. मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शांता मगर पुढील तपास करीत आहेत. तरुण वयात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.













